Saturday, 19 October 2013

लसूणी पालक

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 
पालक - एक जुडी, नीट निवडून
कांदे - दोन मध्यम आकाराचे, उभे चिरून
आलं-लसूण पेस्ट - दोन चमचे
गरम मसाला पावडर - एक चमचा
पाव कप दूध
पाव कप साय किंवा दहा बारा भिजवलेले काजू किंवा दोन मोठे चमचे मिल्क पावडर
साजूक तूप - एक मोठा चमचा
दहा-बारा पाकळ्या लसूण अगदी बारीक चिरलेला
हिरवी मिरची - एक (ऐच्छिक)
मीठ, साखर, तेल

क्रमवार पाककृती: 
१. पालकाची पानं स्वच्छ धुवून निथळत ठेवा.
२. कढईत तेल नीट तापवून त्यात चिरलेले कांदे, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परता.
३. कांदा थोडा शिजला की पालकाची पाने हातानेच उभी आडवी कापून त्यात घालून व्यवस्थित परता.
४. आता कढईवर झाकण न ठेवता पालक-कांदा व्यवस्थित शिजू द्या.
५. पालक शिजला की त्यात गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि आवडत असल्यास साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्या. पाच मिनीटांनी गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या.
६. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमधे वाटून घ्या. काजू घालणार असाल तर आधी भिजवलेले काजू बारीक वाटून घ्या आणि मग त्यात पालक-कांद्याचं मिश्रण घालून वाटा. साय किंवा मिल्क पावडर घालणार असाल तर पालक-कांद्याचं मिश्रण वाटल्यावर त्यातच साय/मिल्क पावडर घालून वाटा. मग थोडं थोडं दूध घालत हवी ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्सर फिरवत रहा.
७. आता भाजी तयार आहे. कढईत काढून घ्या.
८. फोडणीच्या पळीत साजूक तूप गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण घाला. मंद गॅसवर लसूण चॉकलेटी रंगाची होईपर्यंत चमच्याने ढवळत रहा. लसणीचा रंग बदलला आणि खमंग वास आला की पालकाच्या भाजीत घाला आणि नीट ढवळून घ्या.

वाढणी/प्रमाण: 
एक जुडी पालकाची भाजी दोन मोठ्या नगांसाठी एकावेळेच्या जेवणापुरेशी होते.


अधिक टिपा: 
ही भाजी झटपट होते. कांदा, लसूण सोलून चिरणे आणि भाजी शिजणे-थंड होणे-बारीक वाटणे याव्यतिरिक्त कष्ट लागत नाही. पालक शिजला की गळतो आणि नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे, त्यामुळे ती पाने हातानेच ओबडधोबड तोडून भाजीत टाकायची. कांदाही जाडाभरडा चिरून घेतला तरी चालतो.
यात उकडलेले बटाटे घातले तर लसूणी आलू-पालक आणि पनीर घातले तर लसूणी पालक-पनीर स्मित

No comments:

Post a Comment